साहित्य सहवास


Tuesday, March 25, 2014
साहित्य सहवास
25th Mar 2014
२५ मार्च १९३३ - २६ जुन २००१
प्रिय वपु,
आज तुमचा वाढदिवस, आपल्या समाजात नावाच्या मागे कै लागले कि जयंती म्हणायची पद्धत, पण खरेच तुम्ही गेलात का?
ज्या नियती बद्दल तुम्ही एवढे लिहून ठेवलेत ती नियती अशी का रुसली तुमच्या वर आणि का आमच्या पासून केवळ ६८ व्या वर्षी हिरावून घेतले? ६८ हे जाण्याचे वय नक्कीच नाही, पण शेवटी ग दि माडगुळकर म्हणून गेले तसेच आहे "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा"
आज तुम्ही असतात तर आमच्या सारख्या असंख्य चाहत्यांनी, तुमच्या कुटुंबीयांनी नक्कीच तुमचे सहस्त्रचंद्र दर्शन केले असते, पण आता या सगळ्या जर तर च्या गोष्टी.
तुम्ही कुठे तरी लिहून ठेवले आहे ना " परिचयाच्या किंवा नात्यातल्या माणसा पेक्षा, ४ तासाच्या प्रवासात भेटलेली व्यक्ती कधी कधी जवळची वाटू लागते" वपु तुमचे आणि आमचे नाते तरी या पेक्षा काही वेगळे आहे का हो ? आम्हाला जेंव्हा हवे असेल तेंव्हा तुमचे कुठलेही पुस्तक उघडतो आणि मनसोक्त भेटतो?मग तुम्ही कधी प्रवासात भेटता, कधी घरीच रात्रीच्या वेळी उशिरा भेटता, कधी गाडीत भेटता तर कधी चक्क ऑफिस मध्ये भेटता.
तुम्ही जसे आम्हाला भेटता तसे आम्ही पण तुम्हाला प्रत्तेक कथेत भेटतोच ना ? तुम्ही प्रत्तेक कथा आम्हाला समोर ठेवूनच लिहित होतात नातुम्ही तुमचे मन आमच्या जवळ मोकळे केलेत …. आणि आम्ही आमचे !! हिशोब पूर्ण !!!!
नरक म्हणजे काय ? तुम्ही पार्टनर मध्ये किती मस्त एका ओळीत लिहून गेलात " नको असलेली व्यक्ती न जाणे म्हणजे नरक" कसे सुचत होते हो इतकी सोपे लिखाण करायला ?
तसे तुम्ही व्यवसायाने वास्तूविशारद , नोकरी केली मुंबई महानगर पालिकेत आणि नाव कमावले साहित्य विश्वात! तीनही गोष्टींचा एक दुसर्याशी अर्था अर्थी संबंध नाही, पण वपु तुम्हीच हे करू शकत होतात कदाचित महानगर पालिकेतील नोकरी मुळे तुमचा संबंध समजतील वेग वेगळ्या प्रकरच्या लोकांशी आल्या मुळे नकळत कथेला विषय आणि खाद्य मिळत गेलेपण याचा अर्थ असा नव्हे कि महानगर पालिके मुळे तुम्ही साहित्तिक झालात…. नसता मुंबई पालिकेतील प्रत्तेक कर्मचारी कथा लेखक झाला असता…. तुम्ही म्हणाला होतात न " कबुतराला गरुडा चे पंख लावता येतील पण गगन भरारीचे वेड रक्तात असावे लागते
तुमच्या प्रत्तेक कथेत आदर्श नवरा किंवा बायको डोकावते , आणि संपूर्ण कथा कायम मध्यम वर्गीय घरा भोवती फिरत असते ? काय बरे कारण असावे कदाचित तुम्ही जसे वाढलात त्या वातावरणाचा कदाचित परिणाम असेल, आणि तुम्हाला सांगतो वपु त्या मुळेच तुमच्या कथा आमच्या मनाला जास्त भिडल्या .
आता हेच बघा न "किती दमता तुम्ही ? या एका वाक्याची भूक प्रत्तेक स्त्री आणि पुरुषाला असते"…. या वाक्याचे महत्व कळण्या करिता तुमच्या कथा वाचाव्या लागल्या?
तुम्ही अजून एक कलाकृती करून ठेवलीत , जे पुस्तक तुम्ही वडिलांवर लिहिलेत त्याला खरेच तोड नाही " व पु सांगे वडिलांची कीर्ती"। याला कारण प्रत्तेकालाच वडिलान बद्दल भावना असतात, पण किती लोक समर्थ पणे त्या जाहीर करतात, तसेच साहित्य विश्वात वडील या विषयवार लिहिलेली पुस्तके अभावानेच आढळतात…. केवळ त्या एका गोष्टी मुळे पुस्तकाचे महत्व वाढत नाही कारण प्रत्तेक व्यक्ती च्या आयुष्यात वडील हि एक हळवी किनार असते असंख्य आठवणी आणि भावना असतात पण त्या तुम्ही कशा मांडता हे फार महत्वाचे…. तुम्ही तर लेखकच पण त्याहून जास्त महत्वाचे ते एका लेखकाने एका चित्रकाराचे लिहिलेले चरित्र
आपल्या सौ चे ब्रेन ट्युमर चे आजारपण आणि त्याचा दुखद: शेवट , दिवस रात्र मृत्यूची टांगती तलवार ….बायको हि सखी असते असे सांगत तुम्ही आम्हाला नवरा बायको या नात्याची PHILOSOPHY शिकाविलीत…. त्याच नात्या करिता नियती इतकी निष्ठुर पणे का वागली तुमच्याशी ?
कदाचित या अनुभवातून आयुष्याच सार तुम्ही इतक्या सहज पणे सांगून गेलात - "प्रोब्लेम कोणाला नसतात? ते सोडवायला कधी वेळ, कधी पैसा तरी कधी माणसे लागतात"
अंत्य यात्रे ला जाऊन आल्या नंतर अथवा स्मशानातून परत आल्यवर थकवा येण्याचे कारण किंवा मन सैरभैर का होते याचे उत्तर तुम्ही सहज देवून गेलात - "रडणाऱ्या माणसा पेक्षा सांत्वन करणार्यावर जास्त ताण पडतो " किती अचूक लिहून गेलात हो तुम्ही !
तुमचे लेखन जसे गाजले तसेच तुमचे कथा कथन गाजले ,कथाकथनाने अख्या महाराष्ट्राला वेड लावले , तुम्ही कथाकथन थेट साता समुद्रा पार नेलेत लन्दन , अमेरिका , कॅनडा ला कार्यक्रम झाले अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले, कर्तुत्व तुमचे पण मान आमची उंचावली !
महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावेपुरस्कार, फाय फाउंडेशनाचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेतुमचे असंख्य चाहते धन्य झाले.
वपुं तुमच्या दृष्टीकोनाला खरेच दंडवत ! आयुष्याकडे बघण्याचा तुमचा द्रुष्टीकोन खरोखरचं खुपं काही शिकवणारा आहे….
पत्र हे संवादाचे सगळ्यात प्रभावी माध्यम आणि मुख्य पत्र हे असे माध्यम कि ज्यात फक्त दोन लोक संवाद साधतात…. तुम्ही म्हणून गेलाच आहात न "संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात !" म्हणून हा पत्र प्रपंच !
तुम्ही आमच्या पासून खूप दूर गेलात , पण जिथे असाल तिथे नक्कीच सुखी असाल तुमचि कथा ऐकायला आता साक्षात पु ल , प्र के अत्रे , पु भा भावे , बाळासाहेब ठाकरे, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व सारखी दिग्गज मंडळी प्रेक्षक म्हणून असतील आणि तुम्ही म्हणत असाल -
आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे.
आपला वाचक ,
बिपीन कुलकर्णी



0 comments:

Followers

Amhi Sabhasad

Marathi
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com marathiblogs
 

Flickr Photostream

Statecount

View My Stats

Twitter Updates

Meet The Author