कथाकथनाची कथा


पूज्य व. पु. काळे ह्यांनी त्यांच्या चिंचोरे गुरुजींना दिलेली गुरुदक्षिणा :
"होय, माझ्या कथाकथनाचे, लेखनाचे सर्व श्रेय पुण्याच्या माझ्या चिंचोरे गुरुजींना आहे"!
आपल्या गुरुंविषयी व. पुंनी ही आदरयुक्त भावना व्यक्त केली होती, मार्च १९८२ मध्ये मुंबई दूरदर्शन वरून प्रसारित झालेल्या, "आमची पंचविशी"
ह्या कार्यक्रमामध्ये !
मुलाखत घेतांना, सुधीर गाडगीळ ह्यांनी व.पुंना विचारले होते, "कथा-कथनाच्या क्षेत्रामध्ये आपण सर्वोच्च स्थानी आहात, मग, आपण स्वतःला
स्वयंभू कलाकार म्हणाल कां, यामागे आपले कोणी प्रेरणास्थान आहे ?"
मार्च १९८२ मध्ये दूरदर्शन वरून प्रसारित झालेला हा कार्यक्रम ! सुधीर गाडगीळ ह्यांच्या प्रश्नाला व. पुंनी शांतपणे उत्तर दिले, ते म्हणाले, "मी कधीही
स्वतःला स्वयंभू म्हणणार नाही. माझ्या कथाकथानाचे सर्व श्रेय, मी नेहेमीच माझ्या प्राथमिक शाळेच्या चिंचोरे गुरुजींना देत आलोय !
पुण्याच्या भांडारकर रोडवरील बाल शिक्षण मंदिर शाळेचा मी विद्यार्थी ! माझी मोठी बहिण रेखाताई, रोज शाळेतून घरी आल्यावर मला, आईला,
आणि माझ्या मावशीला गोष्ट सांगायची. म्हणायची, "आमच्या चिंचोरे गुरुजींनी सांगितली."
व. पु. म्हणाले, "मी कधी चौथीच्या वर्गात जाईन, असे मला व्हायचे, म्हणजे आम्हाला पण चिंचोरे गुरुजींच्याकडून गोष्टी ऐकायला मिळतील. अन मी १९४२ मध्ये चौथीच्या वर्गात गेलो. चिंचोरे गुरुजी स्वतः हेडमास्तर, ते केव्हांही वर्गात यायचे, आणि चालू असलेला गणिताचा, भाषेचा, इतिहासाचा तास घ्यायचे. तास संपल्यावर ते जायचे, पण, चिंचोरे गुरुजी वर्गात आल्यावर, आम्हां मुलांना खूप आनंद व्ह्यायचा. कारण ते इतिहास शिकवायचे ते गोष्टीच्या माध्यमातून. कविता शिकवायचे ते सुंदरश्या चालीमध्ये म्हणून.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी माझ्या बालमनावर ठसल्या त्या केवळ चिंचोरे गुरुजींच्या मुळेच ! त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, मी घरी जाऊन आईला आणि मावशीला सांगू लागलो. एके दिवशी माझी आई चिडली, अन् म्हणाली, "गुरुजींच्या नकला करतोस काय ? थांब, उद्या शाळेत येऊन सांगते."
दुस-या दिवशी माझी आई, मावशी आणि मी शाळेत आलो. माझ्या आईने, चिंचोरे गुरुजींना सांगितले, हा वसंता, रोज घरी आल्यावर तुमची नक्कल
करतो".
झाले, मला वाटले, आता चिंचोरे गुरुजी मला शिक्षा करणार. कान धरून उठाबश्या काढायला लावतील, भिंतीकडे तोंड करून उभे रहायला सांगतील.
प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. चिंचोरे गुरुजी माझ्या आईला म्हणाले, "वसंता फक्त गोष्टीच सांगतोय ना ? ठीक आहे, मी बघतो."
आई, मावशी घरी गेल्या, आणि मी मात्र वर्गात गेलो ! त्याच दिवशी एका तासाला चिंचोरे गुरुजी आमच्या चौथी अ च्या वर्गात आले. आम्ही मुले उभे राहिलो, नमस्ते झाले. तेव्हां चिंचोरे गुरुजी म्हणाले, "मुलांनो, आज मी गोष्ट सांगणार नाही, तुमच्या वर्गातला हा वसंत काळे गोष्ट सांगणार आहे. माझी तर भीतीने गाळण उडाली, सकाळी शिक्षा चुकली, ती आत्ता होणार, असे वाटले. मी घाबरलो. जागेवरच उभा राहिलो, गुरुजी म्हणाले, ये वसंता, पुढे ये ! हाताची घडी घालून, मी पुढे जाऊन उभा राहिलो. गुरुजींनी माझ्या पाठीवर हात ठेवला अन् म्हणाले, "घाबरू नकोस, कुठली गोष्ट सांगतोस "? "गुरुजी, हिरकणीची सांगू"? "हो जरूर सांग" ! माझे चिंचोरे गुरुजी कधीच रागावून बोलायचे नाहीत, पण त्यांच्या नजरेत धाक होता, पण ते मुलांमध्ये मिसळायचे.
दोन्ही हातांची घडी घालून,मी भीतभीतच हिरकणीची गोष्ट सांगू लागलो. मध्येच माझे लक्ष मागे गेले, मी पाहिले तर, चिंचोरे गुरुजींच्या चेहे-यावर हास्य होते !
पुढे बघ, असे त्यांनी त्यांच्या नजरेनेच मला खुणावले. गोष्ट सांगून झाली आणि गुरुजींनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली, स्वतःच्या कोटाच्या
खिश्यामधून चिंचोरे गुरुजींनी एक रुपयाचे बंदे नाणे काढले आणि म्हणाले, शाब्बास, हे घे बक्षीस !
चिंचोरे गुरुजींनी दिलेले ते माझे कथाकथनाचे पहिले आणि मोलाचे बक्षीस होय !
शाळा सुटायच्या आधी, शाळेचे गणपत शिपाई वर्गात आले आणि, दाबके गुरुजींना म्हणाले, "हेड गुरुजींनी वसंत काळेला बोलावले आहे". मी दप्तर घेऊन, हेड गुरुजींच्या ऑफिसमध्ये गेलो, चिंचोरे गुरुजी म्हणाले, "वसंता, गोष्ट सांगताना कधीही हाताची घडी घालायची नाही. गोष्ट साभिनय कशी सांगायची, ते मला गुरुजींनी दाखविले. आवाजाची चढउतार कशी असावी, हे त्यांनी मला स्वतः ती ती वाक्ये उच्चारून दाखविली.
संध्याकाळी, शाळा सुटल्यावर घरी जाऊन मी आईला, मावशीला, ताईला, चिंचोरे गुरुजींनी दिलेले बक्षीस दाखविले, आणि म्हणालो, मला शिक्षा न
करता, गुरुजींनी गोष्ट सांगायला लावली.
दुसरे दिवशी, चौथी ब मधील एक मुलगा आमच्या वर्गात आला, आणि दाबके गुरुजींना म्हणाला, "आमच्या वर्गात चिंचोरे गुरुजी आले आहेत,
त्यांनी वसंत काळेला बोलावले आहे".
मी चौथी ब च्या वर्गात गेलो, चिंचोरे गुरुजी मला म्हणाले, "वसंता, आज या वर्गात गोष्ट सांग." मी गुरुजींना विचारले, "हिरकणीची सांगू ?" "नको,
काल ती गोष्ट तू सांगितली होतीस, तुझ्या वर्गात ! आज दुसरी गोष्ट सांग, मी तुम्हाला खूप गोष्टी सांगितल्या आहेत", गुरुजी म्हणाले.
"गड आला, सांगू ?", मी विचारले, गुरुजींचा होकार मिळताच, मी त्या वर्गात गोष्ट सांगितली, असे रोज प्रत्येक वर्गात होऊ लागले. शाळा सुटायच्यावेळी गुरुजी मला, त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घ्यायचे आणि नित्यनव्या सुचना करत होते, मी ते शिकत होतो. माझे कथाकथनाचे विश्व उभे केले आणि ते कळसाला पोहोचवण्याचे कार्य, माझ्या चिंचोरे गुरुजींनी केले, कथा कथनाचे माझे विश्व समृद्ध केलय ते, त्यांनीच" !
व.पुंचा दूरदर्शनवरील सादर झालेला हा कार्यक्रम पाहिला, तो त्यांच्या शरपंजरी पडलेल्या साक्षात चिंचोरे गुरुजींनी, आणि ते आनंदाने रडू लागले. मी व. पुंना सविस्तर पत्र पाठविले ! मला खात्री होती, एक ना एक दिवस मला व. पुंचे पत्रोत्तर येईल ! पंधरा दिवस उलटले आणि एप्रिल १९८२ च्या एके दिवशी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास, मी माझ्या घराच्या जिन्यातून बाहेर जाण्यासाठी निघालो, तर खालच्या जिन्यात, समोर साक्षात दत्त म्हणून व. पु. आणि वसुंधरावहिनी माझ्या पुढ्यात ठाकले ! "अहो, इथं चिंचोरे गुरुजी कुठं राहतात ?" इति व पु ! पटकन मी माझ्या चपला बाजूला काढल्या आणि त्या उभयतांना नमस्कार करून म्हणालो, "या या मीच तो पत्र लिहिणारा उपेंद्र चिंचोरे - गुरुजींचा मुलगा" ! व पु माझा हात आपल्या हातात घेत म्हणाले, "अरे अगदी गुरुजींसारखीच तुझी भाषा आहे. गुरुजी आत्ता कसे आहेत ? आत्ता मी अचानक आल्याने काय होईल ?" असे व पुंनी मला प्रश्न केले. आनंदाने माझी बोलतीच बंद झाली होती. "या या, चला," असे म्हणत मी त्यांना माझ्या घरात आणले ! मी पटकन घरच्यांना म्हणालो, "अरे पसारे आवरा, आपल्याकडे व पु आलेत, उठा, आवरा पटकन " माझं बोलणं माझ्या भावाला रविला, खोटं वाटलं . तो म्हणाला, "हां लेका, तू पत्र पाठवलं आणि व पु आले, वाट बघ"! मी भावाला म्हणालो, "अरे खरंच आपल्याकडे व पु आलेत, दादांना भेटायला". माझं बोलणं खोटं समजून तो म्हणाला, "हं जा, व पुंना म्हणावं या हं या" ! त्याचं हे वाक्य दारात आलेल्या वपुंनी ऐकलं आणि ते म्हणाले, "हो हो आलोय "! झालं , मग काय झालं असेल, ह्याची तुम्हीच कल्पना करा.
व. पु. घरात आले. माझ्या वडिलांना कोचावर आणून बसविले. त्यांच्या पायाचे ऑपरेशन झाल्याने ते कुबडीच्या सहाय्याने चालायचे. व पुंना गुरुजींच्या शेजारी कोचावर बसायला मी विनविले पण व पु तिथे बसेनात, एका निमिषात चिंचोरे गुरुजींच्या पायाला हात लावून व पुंनी नमस्कार केला आणि तिथेच खाली जमिनीवर बसले. व. पुंना भरून आलं ! दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले ! काही वेळ तसाच स्तब्धतेत गेला. बरोब्बर चाळीस वर्षांनी त्या गुरु-शिष्याची भेट झाली होती. आम्ही घरचे अवघडलो. वसुंधरा वहिनी मला म्हणाल्या, "तुमचं पत्र आलं तेव्हांपासून ह्यांचं एकसारखं चाललं होतं, मला माझ्या चिंचोरे गुरुजींना भेटायला जायचंय"! मी, व पुंना पुन्हापुन्हा म्हणू लागलो, "अहो आपण इथं कोचावर, खुर्चीवर बसा" ! तेव्हां माझे वडील म्हणाले, "अहो, काळे साहेब, या इथं बसा". त्यावर व.पु. म्हणाले, "गुरुजी, मला आधी ए वसंता, अशी एकेरी हाक मारा, ती ऐकण्यासाठी, पुन्हा बेचाळीस सालात जाण्यासाठी, मी मुद्दाम आज आपल्या घरी आलोय" !
त्यावर वडील म्हणाले, "आपण आता मोठे झालात, अहो, मी एक मराठी शाळेचा साधा प्राथमिक शिक्षक, विद्यार्थी घडविणे, हे माझे कामच होते."
व पु म्हणाले, "गुरुजी, माझ्या आईची तक्रार ऐकून तुम्ही मला शिक्षा केली असती, तर हा वसंता गोष्टी सांगू शकला नसता, कथा लिहू शकला नसता. गुरुजी तुम्ही मला घडवलं आहे, तुम्हाला हे श्रेय देणे म्हणजे, माझी ही छोटीशी गुरुदक्षिणा समजा." मग व पु समोरच्या खुर्चीवर बसले ! आता व पु आणि चिंचोरे गुरुजी, दोघेही, जुन्या आठवणींमध्ये रंगले होते
व. पुंच्यासह, मा. वसुंधरावहिनीसुद्धा आमच्या घरी आल्या होत्या. ते चैत्राचे दिवस होते, आधल्याच दिवशी घरी चैत्रगौरीचे हळदी-कुंकू झाले होते. ह्या उभयतांचे आदरातिथ्य कसे करायचे? अशी कुजबुज स्वयंपाक घरात सुरु झाली. गरम कांदापोहे, करंज्या, चकल्या, अश्या बश्या त्यांचे पुढ्यात ठेवल्या ! . वसुंधरावहिनी माझ्याकडे बघत म्हणाल्या, "माझे पथ्य आहे, गोड करंजी नको". व. पु. पटकन म्हणाले, "वसु , हे माझ्या गुरूंचे घर आहे, आणि तो प्रसाद आहे, तू अवश्य खा, तुला काही त्रास होणार नाही". निमिशभर मी गांगरलो, पण "असू दे, असू दे," असे म्हणत वहिनींनी तो प्रसाद भक्षण केला. व. पुंची गुरुभक्ती केवढी थोर !
व. पुंनी त्यांच्या अनेक पुस्तकातून माझ्या वडिलांचा गौरवोल्लेख केला होता. उदाहरणार्थ वपुर्झा, रंगपंचमी, गुलमोहर, ककची क इत्यादि. व. पुंनी त्यांची
अनेक पुस्तके, आपल्या चिंचोरे गुरुजींना भेट दिली. तेवढ्यात माळ्यावरची एक जुनी ट्रंक मी काढली, कारण व. पुंना माझ्या वडिलांचे जुने फोटो पहायचे होते. फोटो बघतांना व. पु. रममाण झाले, त्यांनी एक फोटो हातात धरला, आणि मला म्हणाले, "उपेंद्र, गुरुजींचा हा फोटो मी माझ्या संग्रहामध्ये ठेवतो."
व. पुंच्या सहवासातील त्या दिवसाचे तीन तास म्हणजे आम्हा घरच्यांना अमृतमय पर्वणी होती !
तेथून पुढे, व. पुंचे नि माझे जे स्नेहबंध गुंफले गेले ते अगदी कायम. अनेकवेळा ते कार्यक्रम संपल्यावर, रात्री सुद्धा फोन करायचे, कधी नगरहून तर कधी नाशिकहून !
आमच्या दोघात पत्रव्यवहार होता. एकदा माझ्याकडून पत्रोत्तरास उशीर झाला, व. पुंचे ताबडतोब पत्र आले, "उपेंद्र, काय झालं ? रागावलास कां ?"
मी त्यांना पटकन फोन केला, "अहो बापू …" माझे बोलणे त्यांनी मध्येच तोडले, म्हणाले, "उपेंद्रा, तुला कितीवेळा सांगितलं, तू माझा धाकटा
गुरुबंधू आहेस, तू मला एकेरी हाक मार, मी फोन ठेवू?" इकडून मी, अहो, माझे पुराण सुरु झाले …
चौदा डिसेंबर १९८६ रोजी व. पुंच्या "क क ची क" ह्या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात झाले ! मा. पु. भा. भावे, अध्यक्ष होते तर शांताबाई शेळके प्रमुख
वक्त्या होत्या. पुण्याच्या टिळक रोडवरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रेक्षागृह तुडूंब भरले होते. व. पुंचे अनेक चाहते, कडेला उभे राहून कार्यक्रमाचा आनंद लुटत होते. मी ही त्यामध्ये होतो. एवढ्यात व. पुंची नजर माझ्याकडे स्थिरावली, त्यांनी तर्जनीने मला खुणावून पुढे बसण्यास सांगितले. शांताबाईंचे भाषण झाले आणि व. पुंनी मला स्टेजवर बोलावले, आणि क क ची क ह्या नव्या पुस्तकाची प्रत माझ्या हाती दिली, मी त्यांना नमस्कार करण्यासाठी खाली वाकलो, तर त्यांनी मला आलिंगन दिले ! फोटो काढणा-या आपल्या चिरंजीवाला म्हणाले, "सुहास, मी आणि उपेंद्र, फोटो घे "!
घरी आल्यावर, मी ते पुस्तक उघडले, तर काय सांगू ? पहिल्याच गोष्टीची सुरुवात, "उपेंद्र, गुरुजींच्या तब्येतीच पानिपत झाल "….
व.पु. माझे गुरुबंधू झाले, सखा झाले, ते अगदी अखेरपर्यंत...आणि २६ जून २००१ ची ती काळी पहाट, व पुंच्या भगिनी रेखाताईंच्या सुनेचा मला फोन आला, आणि काळजात चर्र झालं ! दोन दिवसांनी पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात शोकसभा आयोजित केली होती. पुणे आकाशवाणीच्या डॉ. ज्योस्त्ना देवधर, डॉ. वीणा देव, असे एकसेएक वक्ते होते, आयोजकांनी मला सांगितलं, "बाकी जण व पुंच्या साहित्यावर बोलतील, तुमचे संबंध वेगळे आहेत, म्हणून तुम्ही सर्वात शेवटी बोलायचे आहे" ! आठवणींचा पट मी रडत रडत उलगडण्याचा प्रयत्न केला. आज त्या सगळ्या आठवणी मनात दाटून आल्यात, कारण आज आहे व पुंची जयंती, होय आज २५ मार्च , व. पुंच्या पवित्र स्मृतीला माझे मनोभावे वंदन,
उपेंद्र चिंचोरे
chinchoreupendra@yahoo.com

0 comments:

Followers

Amhi Sabhasad

Marathi
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com marathiblogs
 

Flickr Photostream

Statecount

View My Stats

Twitter Updates

Meet The Author